CHARACTERS

KNOW CHINTOO CHARACTERS

chintoo

चिंटू :

खट्याळ, खोडकर, मिश्कील तरीही निरागस असं चिंटूच वर्णन करता येईल. पप्पू, मिनी, राजू, बगळ्या, नेहा आणि बगळ्याचा कुत्रा बंटी अशी आपली मित्रमंडळी जमवून काहीतरी उचापत्या करणं हा चिंटूचा आवडता उद्योग. या मंडळीना जमवून जोशिकाकुंच्या बागेत जाणं आणि त्यांच्या बागेतल्या कैर्यांवर डल्ला मरणं हा सुट्टीतला त्यांचा आवडता छंद. मिनी आणि राजू बरोबर त्याचे खटके उडत असले तरी त्यांच्याशिवाय चिंटूला करमत नाही.
चिंटूला प्राणी पाळायची खूप आवड. अगदी सरडा, बेडूक, कासव, मांजर, कुत्रा, ससा… काहीही पाळायला तो तयार आहे. पण चिंटूच्या आई-पप्पांचा प्राणी पाळायला ठाम नकार आहे. पण चिंटूने प्रयत्न सोडला नाहीये. नियमितपणे तो आपली मागणी रेटत असतो.
आवडता खेळ मिळवण्यासाठी पप्पांना या ना त्या मार्गाने पटवणे यात मात्र चिंटू वाकबगार आहे.

aai

आई :

चिंटूची आई गृहिणी आहे, चिंटूने खूप अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क मिळवावेत, सर्व भाज्या खाव्यात, हट्ट करू नये, भांडणं करू नयेत अशी सर्व आयांची असते तशी अपेक्षा तिची चिंटूकडून आहे. या स्पर्धेच्या युगात चिंटू पुढे असावा, स्मार्ट व्हावा यासाठी तिची धडपड चालू आहे. नाना तऱ्हांनी ती चिंटूला आदर्श मुलगा बनवण्याचा प्रयत्न करते आहे. पण ते प्रत्यक्षात शक्य नसल्याने धमाल उडते.

pappa

पप्पा :

इंजिनिअर असलेले आणि नोकरी करणारे चिंटूचे पप्पा एक ‘असामी’ आहेत. स्वभावाने मिश्कील, हसतमुख असणारे पप्पा फारच क्वचित रागावतात. ते चिंटूसाठी त्याचे फक्त वडील नसून एक मित्र आणि मार्गदर्शक सुद्धा आहेत. आई बाहेर गेल्यावर भरपूर पसारा करणं, स्वयपाकघरात असफल प्रयोग करणं अशा गमती-जमती पप्पा करतात. या सगळ्याची चिंटूच्या आईला पूर्ण कल्पना असल्याने चिंटूच्या गोंधळाइतकीच पप्पांच्या गोंधळाची आईला काळजी असते.
घरात प्राणी पाळायला चिंटूच्या आई-पप्पांचा ठाम नकार आहे. विविध युक्त्या लढवून चिंटू पप्पांकडे कुत्र्याचं पिल्लू मागत असला तरी पप्पा चिंटूला ओळखून असल्याने ते त्याच्या सर्व युक्त्या उलटवून लावतात.

pappu

पप्पू :

पप्पू हा चिंटूचा सर्वात जवळचा दोस्त. चिंटूची सावली असला तरी पप्पू चिंटूपेक्षा घाबरट आहे. चिंटूपेक्षा कमी व्रात्य असल्याने पप्पू सहसा अडचणीत येत नाही. पण चिंटूला केलेली मदत अगदीच अंगाशी येत आहे असे जाणवल्यास तो पळ काढायलाही मागे पुढे पहात नाही. बहुतेक वेळी कुठलीही खोडी चिंटू आणि पप्पू मिळूनच करतात. पप्पू आणि चिंटू एकमेकांना भेटल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. पप्पू अनेकदा चिंटूला मित्रत्वाच्या अधिकाराने सल्ले, सूचना देतो. चिंटू देखील कधी कधी पप्पूच्या सांगण्यावर विचार करून तसं वागायचा प्रयत्न करतो.

mini

मिनी :

चिंटू ची जवळची मैत्रीण म्हणजे ‘मिनी’. पण ‘तुझ्याशी पटेना तुझ्या वाचून करमेना’ अशी त्यांची मैत्री ! बहुतेक बाबतीत मिनी चिंटूच्या अगदी विरुध्द आहे. अभ्यास करणे, कविता रचणे, गृहपाठ करणे, नाटुकलं बसवणे अशा गोष्टी मिनी अत्यंत आवडीने करते तर चिंटूला यात काडीचीही उत्सुकता नसते.
इतरांवर वर्चस्व गाजवायला मिनीला आवडतं. स्वतः बद्दल बोलायला तसेच कौतुक करून घ्यायला मिनीला आवडते. सर्वांनी कायम तिचंच ऐकावं, तिच्या बद्दलच बोलावं असा तिचा आग्रह असतो. स्वभावाने अत्यंत बडबडी असणारी मिनी भांडणात अजिबात मागे नाही. वेळप्रसंगी मुलांशी मारामारी करायालाही मागे-पुढे पाहत नाही.

raju

राजू :

चिंटूच्या मित्रमंडळातलं हे ‘शक्तिशाली’ व्यक्तिमत्व ! “शरीराने बलदंड आणि बुद्धीने जरा मंद’ अशा शब्दात राजूचं वर्णन करता येईल. कुठलेही- अगदी त्याच्यावरही केले गेलेला विनोद, मारलेला टोमणा किंवा कोपरखळी राजूला मुळीच कळत नाही. मात्र मारामारी करणे, इतरांवर दादागिरी करणे यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे चिंटू आणि मित्रमंडळी राजूला घाबरून असतात. पण तरीही राजूच्या खोड्या काढणं, त्याची चेष्टा मस्करी करणं चिंटू सोडत नाही. अनेकदा राजूच्या हातचा मार खाऊनही चिंटू राजूचा चांगला मित्र आहे.

baglya

बगळ्या :

चिंटूचा दोस्त बगळ्या हे एक ‘मजेदार पात्र’ ! स्वभावाने शांत, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारा बगळ्या एका अर्थाने निरुपद्रवी व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळे प्राणी, पक्षी पाळायचा बगळ्याला छंद. शिवाय त्याच्याकडे बंटी नावाचा कुत्राही आहे. बगळ्या आणि चिंटूच्या मैत्री मागचं हे हि एक महत्वाचं कारण आहे. चिंटू बगळ्याच्या खूप खोड्या काढतो, त्याची चेष्टा मस्करी करतो. असा हा बगळ्या चिंटूच्या मित्रमंडळातला त्यातल्या त्यात शांत मुलगा आहे.

baglya

बंटी :

बगळ्याने पाळलेलं कुत्र्याचं पिल्लू. चिंटूला कुत्रा पाळता येत नसल्याने त्याला बंटी आणि बगळ्या बद्दल जास्तच प्रेम आहे. या बंटीला स्वतःचे विचारही आहेत.

neha

नेहा :

चिंटूचा जसा पप्पू तशीच मिनीची घट्ट मैत्रीण म्हणजे नेहा. कमी बोलणारी आणि शांत असणारी नेहा, चिंटू आणि मित्रमंडळींबरोबर अधून मधून दिसत असते.

satishdada

सतीशदादा :

चिंटूच्या कॉलनीतला ‘young man’ म्हणजे सतीशदादा! नुकताच कॉलेजात जाऊ लागल्याने सिनेमातल्या सारखी ‘hairstyle’ करणारा, fashionable राहणारा सतीशदादा चिंटूला फार ‘great’ वाटतो. इंग्रजी सिनेमे पाहणे (कळत नसतानाही), फुकट अनावश्यक सल्ले देणे, अभ्यासाचा आव आणणे, उगाच फुशारकी मारणे असा त्याचा स्वभाव असला तरी याच सर्व गोष्टींमुळे चिंटूच्या मनात त्याच्याबद्दल ‘भव्य-दिव्य’ प्रतिमा तयार झाली आहे. अभ्यासात, गणित सोडवायला सतीशदादाची मदत घेण्याचा प्रयत्न अनेकदा चिंटू वा मित्रमंडळी करतात, पण सहसा तो प्रयत्न असफल ठरतो. चिंटू कधीच त्याची जाणून बुजून खोडी काढत नाही पण कित्येकदा स्वतःच्याही नकळत त्याच्या कडून सतीशदादाचा पोपट होतो.

joshikaku

जोशीकाकू :

जोशीकाकूंची बाग निरनिराळ्या फळझाडांनी समृद्ध असल्याने कायम चिंटूचं लक्ष्य असते झाडावरच्या कैऱ्या, आवळे, चिंचा, बोर, पेरू, इत्यादी फळ पळवणे, फुलं तोडणे, shortcut पडतो म्हणून बागेतून जाणं अशा उद्योगांमुळे चिंटू जोशीकाकूंचा रोष ओढवून घेतो. केवळ बागच नाही तर अंगणातलं वळवणही त्यांना चिंटू पासून वाचवावं लागतं.
चिंटूची परीक्षा, सहल, आजारपण या बाबत जोशीकाकूही जागृत असतात. त्यावेळात थोडा का होईना, पण काही वेळ तरी त्यांना निवांतपणा मिळतो. केवळ बागेची काळजी नाही तर वानारसेनेचं क्रिकेट खेळणंही त्यांच्या नाकी नऊ आणत. खिडकीच्या काचा फुटण, चेंडूमुळे बागेचं नुकसान होणं यामुळे त्या वैतागतात. चिंटूच्या सर्व युक्त्या ओळखूनच वागतात.
जोशीकाकू जरी चिंटूला रागवत-ओरडत असल्या तरी त्यांच्या मनात चिंटूबद्दल आकस नाही. मनातून त्यांना चिंटूबद्दल जिव्हाळा वाटतो पण त्याच्या खोड्यांमुळे त्या तो आपलेपणा दर्शवत नाहीत.

joshikaka

जोशी काका :

कानाने कमी ऐकू येणारे जोशीकाका आणि चिंटूवर कायम पाळत ठेवणाऱ्या जोशीकाकू या चिंटूच्या संदर्भातल्या उल्लेखनीय व्यक्ती ! कानाने कमी ऐकू येत असल्याने त्यांच्याकडे जोशीकाकूंसाठी निरोप देण्याचे अवघड काम चिंटूची त्रेधा-तिरपीट उडवतं.

sonu

सोनू :

चिंटूच्याच कॉलनीत राहणारा चार वर्षाचा छोटा मुलगा म्हणजे सोनू. सोनू म्हणजे निरागसपणा आणि बेरकीपणा याच बेमालूम मिश्रण आहे. थोडा मोठा झाल्यावर सोनुही चिंटूसारखाच बनेल हे आत्ताच दिसत आहे.